मुंबई : सुरक्षित शहर अशी ओळख असलेली मुंबई एका घटनेनं हादरली आहे. हार्बर मार्गावर धावत्या लोकल ट्रेनमधील महिला डब्यात एका २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे पीडित विद्यार्थिनी महिलांच्या डब्ब्यातून प्रवास करत होती. महिलांच्या डब्ब्यातच तरुणीवर नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. नवाज करीम (वय 40 वर्षे) आरोपीचं नाव आहे.
हार्बर मार्गावरील मस्जिद बंदर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) या स्थानकादरम्यान काल सकाळी 7.28 वाजता हा भीषण प्रकार घडला. पीडित तरुणी मुंबईतील गिरगाव इथली रहिवासी असून ती नवी मुंबईतील बेलापूर इथे एका परीक्षेला जात होती. पीडित तरुणी सीएसएमटी-पनवेल लोकल ट्रेनच्या सेकंड क्लास डब्यातून प्रवास करत होती. ट्रेन सुरु होताच आरोपी डब्ब्यात चढला. मुलगी एकटीच प्रवास करत होती. याचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यावेळी तरुणीने स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरडा सुरु केल्यानंतर आरोपीने मस्जिद बंदर स्थानकावर उतरुन पळ काढला.
यानंतर तरुणीने रेल्वे सुरक्षा दलाकडे (आरपीएफ) जाऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरपीएफ, जीआरपी, क्राईम ब्रान्च आणि मुंबई पोलिसांनी पथके तयार करुन आरोपींचा शोध सुरु केला. पोलिसांनी मस्जिद बंदर स्थानकात बसवलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फूटेज तपासून त्या व्यक्तीची ओळख पटवली.
ठाण्यातही बलात्काराची घटना
आणखी एका प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथून २४ वर्षीय तरुणाला अटक केली. लग्नाच्या बहाण्यानं एका महिलेवर बलात्कार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. आरोपी हा महिलेला उत्तर प्रदेशातील एका लग्नात भेटला होता आणि नंतर तिच्याशी इंस्टाग्रामवर मैत्री झाली होती. पोलिसांनी तीन दिवस पाळत ठेवून आरोपीला दक्षिण मुंबईतील मनीष मार्केट परिसरातून अटक केली.