डोंबिवली : रामनगर पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर मोबाईलचे दुकान आहे. १४ एप्रिलला मध्यरात्रीच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यानी दुकानाचे शटर उचकटून सुमारे चार लाख रुपये किंमतीचे ३३ मोबाईल चोरून नेले होते. हे दोन्ही चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले होते. सीसीटीव्हीच्या आधारे दोन्ही चोरट्यांची ओळख पटवून पोलिसांनी दोघांना सापळा रचत बेड्या ठोकल्यात. सागर पारखे व फिरोज उर्फ बटला खान अशी या दोन चोरट्यांची नावे आहेत. या दोघांविरोधात मुंबईमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यात त्यांनी मोबाईलच्या दुकानातून ३३ मोबाईल चोरले आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
मुंबई परिसरातील पोलीस ठाण्यात घरफोडी, चोरी, मारहाणीसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने पोलिसांनी तडीपार केले होते. तरी देखील शहरातील मार्केट परिसरात येवून मोबाईल दुकानात चोरी करण्याचे धाडस केले. या चोरीनंतर पोलिसांनी दोन्ही चोरट्यांना अटक केली आहे.
आरोपींपैकी 4 लाख 7 हजार रुपये किमतीच्या मोबाईल पैकी एकूण 2 लाख 37 हजार रुपये किमतीचे मोबाईल हँडसेट हस्तगत केले आहेत. हे सदर आरोपी मुंबई येथील अट्टल गुन्हेगार असून त्यांचे विरुद्ध मुंबई येथील विविध पोलीस ठाण्यामध्ये घरफोडी, चोरी, मारहाणीचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
सदर गुन्ह्याची उकल डोंबिवली पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन, पोनि (गुन्हे) श्री समशेर तडवी यांचे मार्गदर्शन व देखरेखी खाली सपोनि बळवंत भराडे, पोउनि केशव हसगुळे, पोडन विजय कांबळे, पोहवा सुनिल भणगे, पोहवा सचिन भालेराव, पोहवा तुळशिराम लोखंडे, पोहवा विशाल वाघ, पोना हनमंत कोळेकर, पोशि शिवाजी राठोड, पोशि राहुल ठाकुर यांनी केलेली आहे.