२५ एप्रिलला बडा नेता भाजपात प्रवेश करणार; चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा दावा

0


राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक मोठा दावा केला आहे. पुढील आठवड्यात एक बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, येत्या मंगळवारी म्हणजेच २५ एप्रिल रोजी मुंबईतील भाजप कार्यालयात अधिकृतपणे त्यांचा प्रवेश होईल, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर शिंदे गटातील १६ आमदार हे अपात्र होईल आणि राज्यातील शिंदे-भाजप सरकारचं बहुमत कमी होईल, अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे भाजपला सरकार टिकवण्यासाठी इतर पक्षाचा पाठिंबा हवा असेल, अशा चर्चाही सोशल मीडियावर सुरू आहे. अशातच चंद्रशेखर बावनकुळेंनी २५ एप्रिलला भाजपात बडा नेता प्रवेश करणार असल्याचा दावा केल्याने राजकीय वर्तुळात खळळबळ उडाली आहे.

एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, "पुढील आठवड्यात एक बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, येत्या मंगळवारी म्हणजेच २५ एप्रिल रोजी मुंबईतील भाजप कार्यालयात अधिकृतपणे त्यांचा प्रवेश होईल. आम्ही पक्षातील नवीन प्रवेशासाठी मंगळवार हा दिवस निश्चित केला आहे, कारण तो दिवस शुभ आहे"

बावनकुळे पुढे म्हणाले की, "या बड्या राजकीय नेत्याव्यतिरिक्त, त्यांचे जवळपास २५ लाख कार्यकर्ते सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करतील". दरम्यान, अजित पवार हे भाजपासोबत येणार का? असा प्रश्न बावनकुळेंना विचारला असता, "अजित पवार (Ajit Pawar) यांची प्रतिमा महाविकास आघाडीच्या काही नेत्यांकडून मलीन केली जात आहे. त्यात भाजपची कुठलीही भूमिका नाही, असं बावनकुळेंनी स्पष्ट केलं आहे.

“अजित पवारांनी भाजपाशी संपर्क केलेला नाही. भाजपाही त्यांच्या संपर्कात नाही. कपोलकल्पित बातम्या तयार होत आहेत. अजित पवारांचे विरोधक या बातम्या तयार करत असतील,अजित पवार आपला पक्ष कसा सोडतील? ते भाजपला पाठिंबा कसा देऊ शकतात? असा उलट सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)