डोंबिवली : जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून डोंबिवलीतील फडके रस्त्यावर रविवारी पै फ्रेन्ड्स लायब्ररीतर्फे आयोजित बुक स्ट्रीटला वाचकप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. डोंबिवलीत प्रथमच नदी सारखी रस्त्यावर मांडण्यात आलेली पुस्तके पाहण्यासाठी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक पहाटेपासून उपस्थित होते. बदलापूर, ठाणे, कल्याण, नवी मुंबई परिसरातील दर्दी वाचक या उपक्रमात सहभागी झाले होते.
हल्ली हातात पुस्तक कमी मोबाईल जास्त असे वातावरण आहे. वाचन संस्कृती कुठे तरी कमी होत असल्याचे बोलले जात आहे. पण ही वाचन संस्कृती वाढवण्याचा मात्र नवकल्पना पुढे येतांना दिसत नाही. पण हातात पुस्तक पडलं की आपोआप वाचनाची गोडी लागते. याचा अनुभव रविवारी डोंबिवलीत आला. एरवी विक्रेते, वाहने आणि माणसांनी ओथंबून वाहणारा फडके रोड पुस्तकांनी फुलून गेला. पहाटे पाच वाजता फडके रोडवर एक नाही दोन नाही तर चक्क लाखभर पुस्तकांच्या पखरणीने बहरला. या पुस्तकाच्या सुंगंधाने अवघ्या सहा तासात सहा हजारपेक्षा जास्त पुस्तकप्रेमी आकर्षित झाले. वाचकप्रेमींनी केवळ सुगंधच घेतला नाही तर आपल्याला आवडलेले फुल (पुस्तक) परडीत टाकून घेऊन गेले. तेही कोणतेही मूल्य न देता आता बोला.
एकीकडे वाचनालये बंद पडत असतांना डोंबिवलीतील पै फ्रेन्ड्स लायब्ररी गेल्या अनेक वर्षांपासून वाचनालय संस्कृती जपून आहे. पण त्या सोबतच नवनवीन संकल्पना आणून वाचन संस्कृती देखील जपत आहे. बुक स्ट्रीट हा असाच एक त्यातील अनोखा उपक्रम. जुन्या, नवीन पुस्तकांचा प्रचार, प्रसार व्हावा या माध्यमातून वाचन संस्कृती वाढीस लागावी आणि त्याच्या सोबतच बाजारात येणारी वैविध्यपूर्ण पुस्तके वाचकांना कळावित हा या बुक स्ट्रीट आयोजनामागचा उद्देश. डोंबिवलीकरांची पहाटच झाली ती या पुस्तकांच्या साक्षीने. सकाळी पाच वाजताच शेल्फमधली पुस्तके फडके रस्त्यावरील माॅडर्न कॅफे हाॅटेल ते अप्पा दातार चौक अशा ३०० मीटर अंथरलेल्या लाल गालिच्यावर येऊन विसावली. ३०० मीटर परिसरात जिथे नजर टाकावी तिकडे फक्त पुस्तके दिसत होती.
बुक स्ट्रीटमध्ये आपला पहिला क्रमांक लागावा म्हणून वाचकप्रेमी नागरिक पहाटे चार वाजल्यापासून फडके रस्त्यावर हजर होते. रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत सुमारे एक हजाराहून अधिक नागरिकांनी बुक स्ट्रीटमधील सहभागासाठी नोंदणी केली होती. बदलापूर, कल्याण, ठाणे शहरापासून नागरिक या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. कडक उन्हामुळे हा कार्यक्रम पहाटे साडेचार ते सकाळी १० या पाच तासांचा ठेवण्यात आला होता.
पुस्तक मांडणी पहाटे पूर्ण झाल्यानंतर उपस्थित नागरिकांना कुपन देऊन बुक स्ट्रीटमध्ये सोडण्यात आले. नऊ वाजेपर्यंत पाच हजारांहून अधिक नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी रांगा लावल्या होत्या. मदन ठाकरे चौकापासून ते ब्राह्मण सभा, सर्वेश सभागृह, टिळकनगर स्टेट बँकेपर्यंत नागरिकांची रांग लागली होती. पुस्तक प्रदर्शन ठिकाणी गर्दी नको म्हणून टप्प्याने वाचकांचे जथ्थे बुक स्ट्रीटवर सोडले जात होते.
डोंबिवली सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, पै फ्रेन्ड्स लायब्ररीचे संचालक पुंडलिक पै यांच्या उपस्थितीत बुक स्ट्रीटचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमात सहभागी प्रत्येक वाचकाला त्याच्या आवडीचे पुस्तक भेट दिले जात होते.