मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदानसोहळा खारघर येथील मैदानात आयोजित करण्यात आला होता.या सोहळ्यात अनेकांना उष्माघाताचा त्रास जाणवला. त्यातील १४ श्रीसदस्यांचा मृत्यू झाला. या मुद्द्यावरून विरोधकांनी रान उठवले असताना आता हा मुद्दा मुंबई उच्च न्यायालयात पोहचला आहे. खारघर दुर्घटनेप्रकरणी जबाबदार असलेल्या प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका सोमवारी हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या याचिकेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पुरस्कार प्राप्त आप्पासाहेब धर्माधिकारी यांनाही तितकंच जबाबदार धरत त्यांच्यावरही फौजदारी कारवाईची मागणी या जनहित याचिकेतून करण्यात आली आहे. विरार येथील सामाजिक कार्यकर्ता शैला कंठे यांनी वकील नितीन सातपुते यांच्यामार्फत ही याचिका हायकोर्टात दाखल केली असून लवकरच यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
इतक्या मोठ्या संख्येनं लोकं येणं अपेक्षित असताना कार्यक्रमाचं ढिसाळ आयोजन, उन्हापासून संरक्षण देणाऱ्या व्यवस्थेचा अभाव, पाणी, वैद्यकीय सुविधा या दुर्लक्ष हे सारे मुद्दे याचिकेतून उपस्थित केले गेले आहेत.
खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर १६ एप्रिल रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी सरकारने कोट्यवधींचा खर्च करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी धर्माधिकारी प्रतिष्ठानचे लाखो श्रीसदस्य जमले होते. या सोहळ्यासाठी २० लाख लोक उपस्थित होते. अनेक लोक आदल्या रात्रीपासून या मैदनावर दाखल झाले होते.
रविवारी १६ एप्रिल रोजी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरु होता. भर दुपारच्या कार्यक्रमामुळे व उन्हाच्या कडाक्यामुळे अनेक लोकांना उष्माघाताचा त्रास झाला. यात १४ जणांचा मृत्य झाला. या घटनेनंतर राज्य सरकारनं संबंधित श्रीसदस्यांच्या कुटुंबियांना तातडीनं आर्थिक मदत जाहीर केली. याशिवाय या कार्यक्रमासाठी १४ कोटी रूपये शासनाच्या तिजोरीतून खर्च केल्याचा आरोपही केला जात आहे. यासंदर्भात ही जनहित याचिका दाखल झाली असून दोषींवर कारवाई करा, या मागणीसह जनतेचा हा पैसा आयोजकांकडून वसूल करण्याची मागणीही करण्यात आली आहे.