'अग्निसुरक्षा सप्ताह', आगीपासून बचाव करण्यासाठी 'या' 10 गोष्टींकडे अवश्य लक्ष द्या
एप्रिल १६, २०२३
0
मुंबईसह देशभरात सध्या अग्निसुरक्षा सप्ताह सुरू आहे. 14 ते 20 एप्रिलपर्यंत चालणा-या या जगजागृती मोहिमेत सर्वसामान्य जनतेला अग्निसुरक्षा दलातर्फे प्राथमिक माहिती दिली जातेय. मुंबईतील (Mumbai) गगनचुंबी इमारतीत दिवसेंदिवस आगीच्या घटना वाढतायत. अशा वेळी आगीचा स्फोट झाल्यानंतर नागरिकांनी प्रथमत: आपली काळजी कशी घ्यावी? यासाठी आम्ही तुम्हाला आगीपासून स्वत:चा बचाव कसा करावा? याच्या 10 टिप्स सांगणार आहोत.
आपल्या आजूबाजूला अनेकदा आगीच्या घटना घडतात. कधी सिलेंडरचा स्फोट होतो तर कधी शॉट सर्किटमुळे इमारतीला, घराला आग लागते. अशा वेळी अनेकदा आपल्याला नेमकं आधी काय करावं हे सुचत नाही. अशा वेळी तुम्ही या टिप्सचा नक्कीच वापर करू शकता आणि स्वत:बरोबरच इतरांचा जीव देखील वाचवू शकता.
फायर सेफ्टी टिप्स
1. आग लागल्यास त्वरित 101 वर कॉल करून माहिती द्या. इतर कोणीतरी याबद्दल आधीच माहिती दिली असावी या गैरसमजात राहू नका.
2. आग लागल्यास, सर्वप्रथम इमारतीचा फायर अलार्म सक्रिय करणे आवश्यक आहे. मग खूप मोठ्याने “आग-आग” ओरडून लोकांना सावध करा. थोडक्यात लोकांना सावधानतेचा इशारा द्या.
3. आग लागल्यास लिफ्ट वापरू नका, फक्त जिन्याचा वापर करा.
4. धुराने वेढलेले असताना, आपले नाक आणि तोंड ओल्या कपड्याने झाकून ठेवा.
5. तुमच्या घरामध्ये आणि कार्यालयात स्मोक डिटेक्टर बसवण्याची खात्री करा. आपली सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे.
6. ठराविक अंतराने इमारतीत बसवलेले फायर अलार्म, स्मोक डिटेक्टर, पाण्याचे स्त्रोत, सार्वजनिक घोषणा यंत्रणा, अग्निशामक यंत्रणा तपासत राहा.
7. तुमच्या जवळील अग्निशामक यंत्राची तारीख तपासा. लक्षात ठेवा की ते वेळोवेळी सर्व्ह केले जावे आणि त्यात अग्निशामक वायू बदलले पाहिजे याची खात्री करा.
8. अग्निशामक यंत्राचा वापर केव्हा आणि कसा करायचा हे नक्की जाणून घ्या आणि लोकांनाही त्याबद्दल माहिती द्या.
9. जर तुमच्या कपड्यांना आग लागली तर पळून जाऊ नका, यामुळे आग आणखी वाढेल. जमिनीवर झोपा आणि गुंडाळा. ब्लँकेट, कोट किंवा जड कापडाने झाकून आग विझवा.
10. अपघात स्थळाजवळ गर्दी टाळा, यामुळे आपत्कालीन अग्निशमन सेवा आणि बचाव कार्यात अडथळा निर्माण होतो.