मुंबई : मुंबईतल्या माहिम परिसरात दोन वर्षांच्या मुलाचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीमध्ये आढळल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. यामुळे माहिम खाडी लिंक रोडवर उघडकीस आलेल्या या घटनेत मुलाचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. प्राप्त माहितीनुसार, बुधवारी माहिम खाडी लिंक रोडवर दोन वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळला. प्लास्टिकच्या पिशवीमध्ये या मुलाचा मृतदेह गुंडाळून रस्त्यालगत टाकण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच शाहूनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलाचा मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला.
याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत तपास सुरु केला आहे. बुधवारी पाहटे 5 वाजताच्या सुमारास कंट्रोल रुमला काॅल आला. सायन-माहिम लिंक रोडवर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये लहान मुलाचा मृतदेह असल्याची माहिती देण्यात आली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पोलिसांना एक लहान मुलाचा मृतदेह दिसला. या मुलाच्या तोंडाला फेस आला होता. तसंच त्याचे डोकं आणि उजव्या मनगटाला उंदरांनी चावा घेतल्याचे दिसून आले.
पोलिसांनी तात्काळ या मुलाचा मृतदेह ताब्यात घेत सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. या मुलाची ओळख पटली आहे. असद अन्सारी असे या लहानग्याचे नाव आहे. तो दोन वर्षांचा असल्याचे प्राथमिक तपासासमोर आले आहे. मुलाची खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्या दृष्टीने पोलिस तपास करीत आहेत. दरम्यान घटनास्थळाहून काही गोष्टी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. शाहूनगर पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची पोलिस ठाण्यात नोंद केली आहे.