दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या तिसऱ्या टप्प्यातील सुनावणीला सोमवारपासून सर्वोच्च न्यायालयातील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर पुन्हा सुरुवात झाली. ही सुनावणी अंतिम टप्प्यात आली असून याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयातील युक्तिवाद आणि सुनावणी पूर्ण होणार आहे.
याच आठवड्यात हे प्रकरण संपवायचे आहे, असे महत्त्वपूर्ण वक्तव्य कालच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केले होते. शिंदे गटाने परवापर्यंत आपला युक्तिवाद पूर्ण करावा, असे निर्देशही सरन्यायाधीशांनी दिले आहेत. तसेच तुम्हीच शिवसेना हे विधिमंडळ ठरवू शकत नाही, असेही सरन्यायाधीशांनी शिंदे गटाला सुनावले आहे.
मंगळवारी ठाकरे गटाचे वकील अॅड. अभिषेक मनू सिंघवी यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर, तर अॅड. देवदत्त कामत यांनी विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पक्षांतर बंदी कायद्यातील दहाव्या परिशिष्टातील तरतुदींना हरताळ फासून हे सत्तांतर झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यानंतर शिंदे गटाचे वकील नीजर कौल यांनी युक्तिवाद केला.