मुंबई : मुंबईत झाडांची संख्या कमी असताना होळी सणाच्या निमित्ताने झाडे तोडणे बेकायदेशीर आहे. झाड तोडल्यास गुन्हा दाखल होतो. मुंबईत कुठेही वृक्षतोड झाल्याचे दिसल्यास नागरिकांनी महापालिका विभाग कार्यालय, स्थानिक पोलिस ठाण्यात उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. होळी सणासाठी झाडांची कत्तल रोखण्यासाठी पालिका सतर्क झाली आहे. होळीसाठी झाडे तोडल्यास कारवाई केली जाईल.
बेकायदेशीर झाडे तोडण्याचे प्रकार निदर्शनास आल्यास महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम, १९७५ च्या तरतुदीनुसार कारवाई केली जाते. या कायद्याच्या कलम २१ अन्वये झाडे तोडणे हा गुन्हा आहे. वृक्ष प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतेही झाड तोडणे हा कलम २१ अन्वये अपराध आहे. अनधिकृत वृक्षतोड करणाऱ्यास प्रत्येक गुन्ह्यासाठी कमीत कमी रुपये १ हजार रुपयेपासून ५ हजार रुपयेपर्यंत दंड आकाराला जातो. तसेच एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कैदेची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.