मुंबई : आगामी लोकसभा अवघ्या एक वर्षावर आहे. या निवडणुका जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी 48 पैकी पाच ते सहा जागा आहेत, त्यावर महाविकास आघाडीचे पूर्णपणे एकमत झालेले नाही. त्यामुळे या जागा बदलू शकतात.
लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला बनला आहे. एकूण 48 जागांपैकी ठाकरे गट 21, राष्ट्रवादी काँग्रेस 19 आणि काँग्रेस 8 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांपैकी चार जागा ठाकरे गट लढवणार असून प्रत्येकी एक जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे.
तिसर्यांदा सरकार स्थापन करण्याची तयारीही भाजपने केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपने यावेळी आपल्या रणनीतीत मोठा बदल केला आहे.
भारतीय जनता पक्षाची जोरदार तयारी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. मोदींची प्रत्येक योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा, अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. आता इतर पक्ष आपले गणित कसे करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक निवडणूक शिवसेना-भाजपच्या प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे भाजपच्या रणनीतीनंतर शिवसेना काय करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होती. 2019 मध्ये भाजपने 48 पैकी 23 जागा जिंकल्या तर शिवसेनेने 18 जागा जिंकल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने 4 जागा जिंकल्या असून काँग्रेस आणि एमआयएमचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला आहे. मात्र आगामी निवडणुकीत भाजपने 45 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यातच शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांवर भाजपची विशेष नजर असणार आहे.