डोंबिवली : लाल बहादूर शास्त्री शाळा ही डोंबिवली पूर्वेतील आयरे गावात कल्याण-डोंबिवली महापालिकेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेत पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग असून यापूर्वी परिसरातील सुमारे 200 गरीब विद्यार्थी या शाळेत शिकत आहेत. या शाळेची इमारत वीस वर्षांपूर्वी बांधण्यात आली असून देखभालीअभावी इमारतीची दुरवस्था झाली असून वर्गखोलीच्या छताचे प्लास्टर कोसळत आहे.
मात्र या शाळेच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे शाळेच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळत आहे, भिंतीला तडे गेले आहेत तर दुसरीकडे स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी पालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून दुरुस्तीची मागणी केली, मात्र पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने पालक वर्गात भीतीचे वातावरण असून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी असलेल्या स्वच्छतागृहांचीही दुरवस्था झाली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.मात्र पालिका प्रशासनाने प्रसाधनगृहांची तात्पुरते डागडुजी केली व इमारतीची देखभाल दुरुस्ती एप्रिल महिन्यात करण्यात येईल असे उत्तर दिल्याने विद्यार्थ्यांना व शिक्षकांना याच इमारतीत शिक्षण घ्यावे लागत आहे.
मोठी दुर्घटना घडण्याची भीती पालक व शिक्षकांकडून व्यक्त केली जात असून जीवितहानी झाल्यानंतरच महापालिका प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.