कसब्यात अभिजित बिचुकले यांना पडलेल्या मतांची चर्चा

0

पुणे : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कसबा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी सुरू झाली. त्यानंतर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी पहिल्या फेरीत मोठी आघाडी घेतली. पहिल्या फेरीत रवींद्र धंगेकर यांना 3000 मतांची आघाडी मिळाली.

मात्र, या फेरीत धंगेकरांच्या आघाडीपेक्षा एका वेगळ्याच गोष्टीची चर्चा रंगली होती. ती म्हणजे अभिजित बिचुकले आणि ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांना पडलेल्या मतांची. अभिजित बिचुकले यांनी कसबा पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज भरून एकच रंगत आणली होती. तर कसब्यात ब्राह्मण समाजावर अन्याय झाल्याच्या मुद्द्यावरुन आनंद दवे यांनीही निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती. मात्र, पहिल्या फेरीतील मतांची आकडेवारी या दोघांच्यादृष्टीने अत्यंत निराशाजनक म्हणावी लागेल.

कारण, अभिजित बिचुकले यांना पहिल्या फेरीत केवळ 4 मते मिळाली आहेत. कसब्यातील ब्राह्मण समाजाचा मोठा पाठिंबा मिळेल, असा दावा करणाऱ्या आनंद दवे यांना पहिल्या फेरीत केवळ 12 मते मिळाली आहेत. नोटा पर्यायाला या दोघांपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. पहिल्या फेरीत नोटा पर्यायासाठी 86 मते पडली आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)