ठाणे : मनसेच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त (MNS 17th Anniversary) ठाणे येथील गडकरी रंगायतन (Gadkari Rangayatan Thane) येथे राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena Chief Raj Thackeray) यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माझ्या वाट्याला गेल्यामुळेच मुख्यमंत्रीपदावरून जावे लागले, असा टोलाही राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. यावेळी मनसेच्या १७ वर्षांच्या काळातील आंदोलनांचा आणि जनतेच्या सोडवलेल्या प्रश्नांचा धावता आढावा घेणार्या डिजिटल पुस्तकाचे प्रकाशन झाले.
- कार्यकर्त्यांना दिल्या शुभेच्छा
राज ठाकरेंनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला सर्वात आधी कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. “मी काल महिला दिनानिमित्त एका कार्यक्रमाला गेलो होतो. तिकडेही अशाच घोषणा झाल्या. घोषणा चालू असताना मला एक गोष्ट आठवली, विरोध होता तो, एकेदिवशी शिवचरित्रकार दत्तू मामा पोतदार रायगडावर गेले, जाता-जाता त्यांनी आकाशात पाहिलं, समोर शेतकऱ्याला विचारलं पाऊस पडेल का? त्याने बघितलं आणि म्हणाला वाटत नाही”, असं राज म्हणाले.
“थोड्या वेळाने ढग आले, जोरात पाऊस पडला. काय करायचं? यांनी टकटक केली. आतून आवाज आला. कोण आहे? यांनी सांगितलं शिवचरित्रकार दत्तू पोतदार. आतून आवाज आला इथल्या लोकांना जागा नाही. तसं माझ्या बाबतीत समजा झालं, मी झोपडीवर टकटक झाली आणि घोषणा देणाऱ्यांपैकी घरात घेतील का?”, असं राज ठाकरे मिश्किलपणे म्हणाले.
- संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना इशारा
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतलीये. "ज्यादिवशी संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाला, त्यादिवशी मला अनेकांनी विचारलं, तुम्हाला यावर काय म्हणायचंय, कुणी हल्ला केला असेल? तुमचा कुणावर संशय आहे? त्यावर मी त्यांना एवढंच सांगेन, ज्याने हल्ला केला त्याला आधी कळेल, मग सगळ्यांना कळेल. माझ्या मुलांचं रक्त मी वाया जाऊ देणार नाही कारण ते महाराष्ट्राची सेवा करतायेत", असं राज ठाकरे म्हणाले.
- राज ठाकरे यांचा भाजपला इशारा
विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी यावेळी भाजपला देखील इशारा दिला. “भरतीनंतर ओहटी आणि ओहटीनंतर भरती या गोष्टी होतातच. भारतीय जनता पक्षानेही लक्षात घेतलं पाहिजे, आज भरती चालूय, ओहटी येणार. ओहटी येऊ शकते. नैसर्गिक आहे ती गोष्ट, ती कोणी थांबवू शकत नाही”, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. दरम्यान, “या सगळ्या कालखंडात पुढे जात असताना आजच्या परिस्थितीत आमचा राजू पाटील बघा. पक्षाची बाजू विधानसभेत एकटे मांडत आहेत. शोले चित्रपटात बोलत नाही का, एकही है मगर काफी है. संपूर्ण विधानसभा भरली तर यांचं काय होईल? पण हे जाणूनबुजून अशाप्रकारचा प्रचार केला जातो”, असं राज ठाकरे म्हणाले.
- राज ठाकरे यांचा पत्रकारांवर निशाणा
“ज्या लोकांकडून लिहिलं बोललं जातं ते समजून न घेता कुणीतरी सांगितलेलं असतं की या प्रकारे प्रचार करा. आणि मग ते पत्रकार तशाप्रकारे प्रचार करतात आणि संभ्रम निर्माण करतात. एवढी गर्दी जमते आणि मतं जातात कुठे? आंदोलनं अर्धवट सोडतात. एक आंदोलन दाखवा अर्धवट सोडलेलं. सगळ्या जबाबदाऱ्या आमच्याच आहेत का?”, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
“जे पत्रकार आम्हाला प्रश्न विचारतात ते इथर पक्षांना विचारतात का? ज्या आंदोलनामुळे महाराष्ट्रातील 65 ते 70 टोलनाके बंद झाले. तेच अडीच वर्षापूर्वी गळ्यात गळे घालणारे शिवसेना आणि भाजप यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात दिलं होतं की आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करु. त्यांना एक पत्रकार प्रश्न विचारत नाही”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.
- ‘आपण सत्तेपासून दूर नाही’, कार्यकर्त्यांमध्ये हुंकार भरण्याचा प्रयत्न
“पक्ष चालवताना त्रास होतो. प्रत्येक पक्षाला त्रास होतो. आज भाजप सत्तेवर दिसतो, पण त्यासाठी अनेकांनी कष्ट घेतले. 1952 साली जनसंघ हा पक्ष स्थापन झाला, त्यावेळी कॉंग्रेस सोडून दुसरं काहीच नव्हतं. तीन वेळा अटलजी आले. परत काँग्रेस बोकांडी बसली. 2014 ला बहुमत हाती आलं. आपण सत्तेपासून दूर नाही. हे मळभ दूर होईल”, असं म्हणत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांमध्ये हुंकार भरण्याचा प्रयत्न केला.
“मी नुसती आशा दाखवत नाही. मला हे माहिती आहे. महापालिका जिंकायच्या आहेत. कधी निवडणूक होईल माहीत नाही. गेली २ वर्ष दहावीला नापास झाल्यासारखं वाटायला लागलंय. मार्च-ऑक्टोबर, मार्च-ऑक्टोबर… कधीही निवडणुका होऊदेत. महापालिकेत आपण सत्तेत असणार म्हणजे असणार”, असं राज ठाकरे म्हणाले.
- ‘इतकं घाण, गलिच्छ राजकारण पाहिलं नाही’
“आता जे काही सुरू आहे ते महाराष्ट्राला खड्ड्यात नेणारं आहे. इतकं घाण, गलिच्छ राजकारण मी आजपर्यंत कधी पाहिलं नव्हतं. ज्या महाराष्ट्राने देशाचं प्रबोधन केलं तो हाच आहे का? किती खालच्या पातळीला जाऊन बोलावं याची काही मर्यादाच उरलेली नाही. हल्ली बातमी नसतेच, फक्त हा काहीतरी बोलला, तो काहीतरी बोलला”, असं राज ठाकरे म्हणाले.
- 22 तारखेला कुणाला फाडायचं आहे, वाभाडे काढायचे आहेत, ते काढीन
“22 तारखेला गुढीपाडव्याची सभा आहे. सायंकाळी ‘शिवतीर्था’वर यावं हे आपल्या सर्वांना आमंत्रण. मला जे काही बोलायचं आहे कुणाला फाडायचं आहे, वाभाडे काढायचे आहेत, ते मी 22 तारखेला काढीन”, असा इशारा राज ठाकरेंनी दिला. “यांच्या रोजच्या तमाशांना जनता विटलेली आहे. फक्त आपण त्यांच्यापर्यंत जाणं महत्त्वाचं आहे. महापुरुषांचे पुतळे उभारून काही होत नाही. जयंत्या, पुण्यतिथी या पलीकडे काही हाती लागणार नाही. ते काय करून गेले, बोलून गेले याचं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे”, असंदेखील राज ठाकरे म्हणाले.
- ‘…म्हणून आपल्या वाट्याला जायचं नाही’, राज ठाकरे यांचा भाजप खासदाराला टोला
“तुमचं हिंदुत्व म्हणजे नुसती जपमाळ असते का? प्रत्यक्ष कृतीतून तर कधी दिसत नाही. मला अयोध्येला बोलावलं, पण विरोध करणारे हिंदुत्त्ववादीच. आतलं राजकारण मला कळलं म्हणून मी गेलो नाही. मग ज्यांनी हे राजकारण केलं त्यांचं काय झालं पुढे? म्हणून आपल्या वाटेला जायचं नाही”, असा टोला राज ठाकरे यांनी बृजभूषण सिंह यांना लगावला. बृजभूषण सिंह यांच्यावर देशाच्या दिग्गज महिला मल्लांनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे त्यांना महत्त्वाच्या पदावरुनही पायउतार व्हावं लागलं आहे. त्याच गोष्टीचा धागा पकडत राज ठाकरेंनी नाव न घेता निशाणा साधला.
- राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही टोला लगावला. “भोंगे प्रकरणात राज्यभर कार्यकर्त्यांवर केसेस केल्या आणि मुख्यमंत्रीपद गेलं. बोललो ना वाटेला जायचं नाही”, असं राज ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले.