उच्च न्यायालयाचे निकाल आता मराठीतून : सर्वसामान्यांना निकाल समजणं होणार सोपं

0

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल आता मराठीतही मिळणार आहे. बुधवारपासून उच्च न्यायालयाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर मराठीत निकाल अपलोड करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता सर्व सामन्यांना उच्च न्यायालयाचा निकाल मराठीत वाचता येणार आहे. सध्या हा पर्याय काही ठराविक निकालांपुरताच मर्यादीत असल्याने ‘निवडक निर्णय’ या शिर्षकाखाली तयार करण्यात आला आहे. बाकी अन्य निकाल हे नेहमीप्रमाणे इंग्रजी भाषेत उपलब्ध असतील.

देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी २५ जानेवारी ही न्यायालयांशी निगडीत या नव्या सेवेचे लोकार्पण केले होते. सर्वोच्च न्यायालयातील निकालही देशातील विविध स्थानिक भाषांत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या सेवेतून सध्यातरी २ हजार ९०० विविध हे मराठीसह अन्य भारतीय भाषांतून उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

त्यानुसार, बुधवारी पहिल्या दिवशी न्या. धीरज सिंह ठाकूर आणि न्या. कमला खाता, न्या. धीरज सिंह ठाकूर आणि न्या. अभय अहुजा आणि न्या. अजय गडकरी आणि न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने दिलेले निकाल मराठीतून उपलब्ध केले आहेत. मराठीतील या निकालांचा वापर मर्यादीत स्वरूपाचा असून नागरिकांना त्यांच्या मातृभाषेत निकाल हे त्यांना ते योग्यरितीने समजावेत यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्याचे या निकालांवर लिहिण्यात आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)