डोंबिवली : एमआयडीसी फेज १ मधील खंबाळपाडा येथील सीएनजी पंपच्यामागे असलेल्या दोन कंपनीत मध्यरात्री भीषण आग लागली. पर्फ्यूम कंपनी आणि कपडा कंपनी या कंपन्यांमध्ये आग लागल्याची माहिती कामाचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी दिली. मोठंमोठे स्फोट होऊन आगीचे लोळ उंचच उंच उठत होते. यामुळे एमआयडीसी फेज १ मधील खंबाळपाडा येथील आजूबाजूच्या कंपन्यांनाही धोका निर्माण झाल्याने भीतीचे वातावरण पसरले होते.
आगीमुळे परिसरातील कंपन्या, महानगर गॅसला धोका निर्माण होण्याची शक्यता आणि दोन्ही कंपन्यांना आगी लागल्यामुळे आगीची तीव्रता वाढणार होती. ‘कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोशिएशन’चे अध्यक्ष देवेन सोनी यांनी तातडीने जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, प्रांत अभिजीत भांडे-पाटील यांना संपर्क केला. तातडीने अग्निशमन दलाच्या इतर भागातील वाहने पाठविण्याची मागणी केली. तोपर्यंत कल्याण डोंबिवली पालिका अग्निशमन दलाचे सहा बंब आणि जवान आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. कामा संघटनेचे आपत्कालीन पथक याठिकाणी सक्रिय होते. जिल्हाधिकाऱ्यांनी भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर पालिकेच्या अधिकाऱ्यांना संपर्क करुन तातडीने डोंबिवलीत बंब पाठविण्याच्या सूचना केल्या. वेगळ्या भागातून १० अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी सात तासाच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणली. सध्या या ठिकाणी कुलिंगचे ऑपरेशन सुरू आहे. या दोन्ही कंपन्यांमधील कर्मचारी संध्याकाळी कंपनी बंद करून घरी निघून गेल्याने सुदैवाने कंपनीत कोणी नव्हतं त्यामुळे जीवितहानी टळली. आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. या आगीत प्राज टेक्सटाइल आणि रॅमसन्स या दोन्ही कंपन्या जळून खाक झाल्या आहेत.
सर्वत्र धूर, कोळसा या व्यतिरिक्त काहीही दिसत नाहीये. कपड्याच्या कंपनीत तर सर्वाधिक कोळसा दिसत आहे. संपूर्ण कपडे जळून राख झाले आहेत. होत्याचं नव्हतं झालं आहे. त्यामुळे या दोन्ही कंपनी मालकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण समोर आलं नाही. आगीचं कारण शोधण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
डोंबिवली खंबाळपाडा येथील सीएनजी पंपाजवळ भीषण आग. @AmhiDombivlikar @ThaneCityPolice pic.twitter.com/2reNKDVM1d
— महामुंबई मंथन | MahaMumbai Manthan (@MumbaiManthan) March 8, 2023