राज्यातील सत्तासंघर्षावर आजपासून पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी

0


नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची आज, १४ मार्चला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याप्रकरणात ठाकरे गटाकडून युक्तिवाद पूर्ण झाला आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून युक्तिवाद सुरू आहे. शिंदे गटाकडून युक्तिवाद झाल्यानंतर ठाकरे गटाकडून त्याचे प्रत्युत्तर सादर केले जाईल. त्यामुळेआजच्या सुनावणीत शिंदे गटाकडून काय युक्तिवाद होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

गेल्यावर्षी महाराष्ट्रात सत्ता बदल झाला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. त्यांना ४० आमदारांचा पाठिंबा मिळाला. या सर्वांनी एकत्र येत भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. या सत्ता बदलाची सध्या सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरू आहे. सत्ता बदल होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक १६ आमदारांवर तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केलेली अपात्रतेची कारवाई, माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे विशेष अधिकार यासह विविध मुद्द्यांवर ही सुनावणी सुरु आहे.

  • मागील सुनावणीत काय घडले?
मागील सुनावणी वेळी ठाकरे गट व शिंदे गट या दोन्ही गटांच्या वकिलांकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. ठाकरे गटाते वकील कपिल सिब्बल यांनी काही तांत्रिक प्रश्न समोर ठेवल्यामुळं ठाकरे गटाची बाजू भक्कम असल्याचं बोललं जात आहे. तर शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांनी यु्क्तीवादात म्हटले की, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले नाहीत. सध्या हे प्रकरण पुस्तकी (अॅकेडमिक) आहे. त्यामुळे जे आमदार 16 अपात्र झाले तोच मुद्दा सुप्रीम कोर्टासमोर आहे, असे देखील हरिश साळवे म्हणाले होते. राज्यपालांची भूमिका योग्य होती. राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना बहुमत चाचणीसाठी बोलावले होते. परंतु उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणीला नकार दिला आणि राजीनामा दिला. त्यामुळं हा पेच निर्माण झाला. राज्यपालांसमोर पर्याय नव्हता त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदेने बहुमत चाचणीसाठी बोलावले. असा युक्तीवाद साळवेंनी केला होता. त्यामुळं आज पुन्हा एकदा काय युक्तीवाद केला जातो याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत निर्णय होणार?
तर दुसरीकडे महाराष्ट्रात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात‌ नवी तारीख काय असणार याचे उत्तर मिळणार आहे. राज्यातील राजकारणाच्या दृष्टीने ही महत्त्वाची दोन प्रकरणे सुप्रीम कोर्टासमोर येणार असल्याने राज्याचे लक्ष आज सुप्रीम कोर्टाकडे लागले आहे. येत्या 48 तासांत सत्ता संघर्षांची सुनावणी संपणार आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंचे राजकीय भवितव्य या निकालावर अवलंबून आहे. सकाळी 11 वाजता सुनावणीला सुरुवात होईल.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)