डोंबिवली : माजी आमदार सूर्यकांत देसाई यांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात हलवत असताना वाटेत रुग्णवाहिका थांबल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे खळबळ उडाली आहे. तसेच रुग्णवाहिका बंद पडल्यामुळे देसाई यांचा मृत्यू झाल्याने संतापही व्यक्त केला जात आहे. तसेच संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
सूर्यकांत देसाई यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने गुरुवारी डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्या रुग्णालयात व्हेंटिलेटर नसल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे त्या रुग्णालयाच्या डॉक्टरांनी रुग्णवाहिका बोलावली. रुग्णवाहिका आली तेव्हाच ती अर्धवट बंद होती. देसाई यांना रुग्णवाहिकेत नेले तेव्हा त्यांचा प्लस रेट ६० पर्यंत होता.थोडे अंतर गेल्यावर रुग्णवाहिका थांबली. त्यानंतर आम्ही सर्व नातेवाईकांनी मिळून ही रुग्णवाहिका मंजुनाथ शाळेकडे ढकलली.
आम्ही रुग्णवाहिका जवळपास अर्धा किलोमीटर ढकलली. दरम्यान, नोबल्स हॉस्पिटलमधून दुसरी अॅम्ब्युलन्स बोलावण्यात आली. त्यानंतर देसाई यांना ममता रुग्णालयात हलवण्यात आले. यावेळी देसाई यांचा ईसीजी घेण्यात आला. मात्र, तोपर्यंत देसाई यांचा मृत्यू झाल्याची माहिती देसाई यांच्या पुतण्याने दिली.
दरम्यान, देसाई यांना वेळेत उपचार मिळाले नसल्याने ते रुग्णवाहिकेतच कोंडले होते. देसाई यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी या रुग्णवाहिकेच्या मालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.