मुंबई : कांद्याला भाव नसल्याने कांदा उत्पादक मेटाकुटीला आले होते. कांद्याच्या भावावरून शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. नाशिकमध्ये तर एका शेतकऱ्याने कांदा पिकाला आग लावली होती. शेकऱ्यांच्या या आंदोलनाला यश आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांद्याला प्रती क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे मंजूर केले आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत घोषणा केली. त्यांच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
आज अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर हातात गाजरं घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन सरकारला जाब विचारण्यासाठी आंदोलन केले. त्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरु होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी म्हटले की, कांदा नाशिवंत असल्याने त्याला किमान आधारभूत किंमत लागू करता येत नाही. कांदा हे महाराष्ट्रातील महत्त्वाचं नगदी पीक आहे. त्यामुळे कांद्याचा भाव शेतकऱ्यांचादृष्टीने अत्यंत संवेदनशील जिव्हाळ्याचा भाग आहे. देशांतर्गत मागणी, निर्यात अशा घटकांचा कांद्याच्या दरावर परिणाम होतो. या सगळ्या घटकांमुळे यंदा कांद्याचे भाव गडगडले होते. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आपण एक समिती नेमली होती. या समितीमध्ये सर्वंकष विचार झाल्यानंतर कांदा उत्पादकांना २०० रुपये ३०० रुपये शिफारस केली होती. पण आपले सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याने शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३०० रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.